निबंधाची मराठी माध्यमातून तयारी
888 subscribers
49 photos
1 video
10 files
19 links
मराठी माध्यमातुन निबंध लेखनाची तयारी!
Download Telegram
🇮🇳 प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना खूप सदिच्छा 🇮🇳

प्लेटोच्या 'रिपब्लिक' या ग्रंथात मांडण्यात आलेल्या "तत्त्वज्ञ राजा" या संकल्पनेत आजच्या रिपब्लिक (प्रजासत्ताक) संकल्पनेच्या अगदी विपरीत राज्यव्यवस्था सांगितली होती. ती व्यवस्था तत्कालीन अथेन्सच्या लोकशाही व्यवस्थेला पर्याय होती. पण तेव्हा पासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेच्या संकल्पनेत झालेले स्थित्यंतरे आपल्याला लोकशाही-प्रजासत्ताक या सर्वमान्य कमीत कमी त्रुटी असणार्‍या राज्यपद्धती पर्यंत घेऊन आले आहे. तर आजच्या दिनी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपल्याला काही गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात.

आपण काय मिळवले आणि पुढील येणार्‍या काळात आपण कशासाठी काम करणार आहोत याचा दृढनिश्चय करण्याचा हा काळ आहे. आपल्याला वारसा म्हणुन मिळालेल्या या प्रजासत्ताकाला असेच वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्याला टिकवण्यासाठी कार्य केले पाहिजे. कालच आपण #NationalVotersDay साजरा केला त्या निमित्ताने एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की आपण जागरूक नागरिक म्हणून मतदान आणि राजकीय विचारप्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे.

"मानव हा निसर्गतःच राजकीय प्राणी असतो" या ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे 'अ'राजकीय असे काही नसते.ही खुणगाठ मनाशी पक्की बांधुन घेतली पाहिजे. रॉबर्ट मिशेल्स यांच्या "अभिजनशाहीची पोलादी चौकट" या संकल्पनेत अब्राहम लिंकन यांची "लोकांची लोकांनी लोकांसाठी" चालवलेली व्यवस्था असलेली लोकशाही हरवून जायला नको. यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपण दृढनिश्चय करणे अगत्याचे आहे.

देश म्हणुन आपण आज सर्वच क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केली आहे. तिला पुढे नेत असताना देशांतर्गत सहिष्णुता, सौहार्द आणि सर्व समावेशकता टिकून राहिली पाहिजे हे देखील आपल्या समोरील आव्हान आहे. आज आपण ज्यांच्यांमुळे स्वातंत्र्य प्राप्त केले, ज्यांच्या बलिदानाने ते आजपर्यंत टिकले, जे त्या स्वातंत्र्याला अर्थपूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतायत, या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे क्षण आहेत. त्यांच्या कर्तुत्वातून ऊर्जा अर्जित करून आपापल्या परीने देश सक्षमीकरणाच्या कार्यात सहभागी होऊन, लौकिक अर्थाने आपण प्रजासत्ताक चिरायू करू यात.

जय हिंद!

- ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ जाधव.

(Team UPSCinMarathi)

@UPSCin_Marathi